अध्यात्म अज्ञान तप: साधनेतून साकारणाऱ्या पवित्र गोष्टी! यांचा परस्पर संबंध तर आहेत पण या दोन तपस्वींचा संगम म्हणजे दुग्धशर्करा योगच. असेच दोन तपस्वी भटवाडी घाटकोपर परिसरात एकत्र आले, 1986 साली पुण्यात्मा सद्गुरु स्वामी रामानंद यांनी भटवाडी घाटकोपर (पश्चिम) येथे असलेल्या स्वतःच्या जमिनीवर समाजासाठी शैक्षणिक कार्य व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आणि शिक्षण महर्षी माननीय श्री. राऊत सरांनी या कल्पनेला मूर्त स्वरूप दिले. शिष्याने गुरु आज्ञा प्रमाण मानून सन 1987 सावी स्वामी रामानंद एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व स्वामी शामानंद हायस्कूलचे इवलेसे शैक्षणिक रोप भटवाडी परिसरात रोवले, आज त्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षात रूपांतर झाले असून शिशु ते बारावीपर्यंतच्या वर्गात सुमारे १२०० विद्यार्थी शिकत आहेत.
संस्थेचे आधारस्तंभ व संचालक शिक्षण महर्षी माननीय श्री. राऊत सर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कै. श्रीम. विद्या राऊत मॅडम या उभयतांच्या नेतृत्वाखाली मागील 38 वर्षे या संस्थेचे शैक्षणिक कार्य अविरत सुरु आहे. परंतू सरांना एकच खंत आहे की स्वामींनी शैक्षणिक कार्यासाठी दिलेली जागा अखत्यारीत असूनही संपूर्ण शाळा भाडेतत्त्वावर भरत आहे, परंतु त्यांची जिद्द व स्वामींवरील श्रद्धा आणि विश्वास संस्थेचे हेही प्रश्न सुटतील असे मानून संस्था यशस्वी मार्गक्रमण करीत आहे.
कटयांमध्ये राहूनही गुलाबाचे सौंदर्य खुलून दिसते मग ते काटे, काटे न राहता जीवनाचा अविभाज्य भागच बनतात त्या प्रमाणे असंख्य संकटांना, समस्यांना आव्हान समजून त्याही परिस्थितीवर मत करत स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक (वाणिज्य)व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या परिस्थितीने गांजलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने सन 1993 सारी स्वामी रामानंद नाईट हायस्कूल व सन 2000 सावी स्वामी रामानंद नाईट ज्युनिअर कॉलेजची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व कला गुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या धोरणांन्वये ज्ञानरचनावादी अध्ययन – अध्यापन, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, इंग्रजी संभाषण उपक्रम, टिळक विद्यापीठ परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा असे अनेक अभिनव उपक्रम राबविले जातात. आधुनिक प्रवाहात राहण्यासाठी शाळेने पुढील योजना अमलात आणल्या आहेत. अध्ययन अध्यापनात ई-लर्निंगचा जास्तीत जास्त वापर, डिजिटल वर्ग, कृतीयुक्त शिक्षण या सर्व उपक्रमांचे यश म्हणजेच शाळेचा एस.एस.सी.चा निकाल सतत 99% एवढा असतो व बारावीचा निकाल 75% पेक्षा जास्त असतो. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत देखील जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तिर्ण होत आहेत व शिष्यवृत्ती प्राप्त करीत आहेत. रात्र शाळेचा एस.एस.सी.निकाल या वर्षी शंभर टक्के असून बारावीचा निकाल 75 टक्के आहे. दिवसा काम करून रात्र शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे हे यश अभिमानास्पदच आहे.
आज या संस्थेतून ज्ञानसंपन्न झालेले माझी विद्यार्थी शाळेने दिलेल्या संस्कार शिदोरी ला विसरले नाहीत. आपले जीवनशिल्प आकाराला आणणारी, व्यवहारी जगत मजबुतपणे पाय रोवून जगायला शिकविणार्या शाळेसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थी संघ स्थापनेतून विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रम भेट, वैद्यकीय आरोग्य शिबीर, डिजिटल वर्ग, कबड्डी कराटे प्रशिक्षण, क्रीडा अकादमी वर्ग इत्यादी विविध अभिनव उपक्रम प्रत्यक्षात आणून ज्ञानवृद्धी च्या कार्यात कायम शाळेला मनस्वी मदतीचा हात आपल्या मागून येणार्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श म्हणून व्रथस्थपणे राहू दिला आहे. तसेच “गौरव महाराष्ट्राचा” या विद्यार्थी निर्मित कार्यक्रमातून संस्थेला विकासात्मक योजनांसाठी निधी उपलब्ध करून देत ऋणाईततेची भावना जोपासली आहे.
दिल्ली येथे एन.सी.सी. कॅडेट परेडमध्ये सहभागी रसिका माने, गिनीज वर्ल्ड बुक मध्ये विक्रमी नोंद असलेला तबलावादक मयुरेश मोहिरे, तायक्वांदो पटू साईराज लोहोट, महाराष्ट्राची कबड्डीपटू मयुरी सूर्वे व साक्षी माने, कबड्डी पंच योगेश शेवाळे याच संस्थेचे विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, संयोजक, गायन, अभिनय, राजकारण इत्यादी क्षेत्रात नावारूपाला आले आहेत तर काही विद्यार्थी सातासमुद्रापलीकडे ज्ञानार्जन व अर्थार्जनासाठी स्थित आहेत. संस्थेचा दर्जा पाहता मासूम संस्था, बालसंस्कार केंद्र व कोटक एज्युकेशन फाऊंडेशन या संस्था विद्यार्थ्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप देण्यासाठी संस्थेच्या कार्यात सहभागी झाल्या आहेत. शाळेची यशस्वी घोडदौड सुरू आहे, ती माननीय राऊत सर यांचे खंबीर नेतृत्व विश्वस्त माननीय डॉक्टर विनय राऊत यांचे नियमित मार्गदर्शन तसेच संस्था प्रतिनिधी माननीय माधवी नांदेडकर मॅडम यांच्या कडून मिळत असलेल्या शैक्षणिक प्रेरणा, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे परिश्रम या सर्वांना उत्तम साथ लाभली आहे ती आमच्या पालकांची. त्यांचे हे प्रेम आम्हाला सतत मिळत राहो हीच ईश्वर चरणी सदिच्छा. ज्ञानाचा हा ज्ञानकुंड अविरत व अव्याहतपणे प्रज्वलित राहील यात शंकाच नाही.
© 2016 - All Rights belongs to Swami Shamanand Education Society